पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता पाचवी विशेष फेरी होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आजपासून (२ सप्टेंबर) अर्ज करता येणार असून १० सप्टेंबरला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीतून दहावीच्या परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.
यंदा ३४३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजार ६४५ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि चार विशेष फेऱ्यांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून ६७ हजार १०१ विद्यार्थ्यांनी, तर राखीव कोट्यातून ८ हजार ९६२ अशा एकूण ७६ हजार ६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशासाठी केंद्रीभूत आणि कोटा मिळून ४४ हजार ५८२ जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेश न घेतलेले, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण, एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या विशेष फेरीतून प्रवेश घेता येणार आहे.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २ ते ९ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील, नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरता येईल. तसेच या फेरीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज पुन्हा अंतिम करून ऑनलाइन संमती द्यावी लागेल. पाचव्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी १० सप्टेंबरला जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर १० ते १४ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. पाचव्या विशेष फेरीसह कोटा प्रवेश आणि द्विलक्ष्यी अभ्यासक्रमांचीही प्रवेश प्रक्रिया होणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले.




