
पुणे : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या रविवारी रात्री गोळीबार करुन आणि कोयत्याने वार करुन निर्घुण खून करण्यात आला . कौटुंबिक वादातून हा खून करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वर्चस्वाच्या वादातून जावयानेच या खूनाचा कट रचल्याचे सांगण्यात येत आहे.

गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई. त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये हे दुकान पाडले. त्यानंतर कुटुंबामध्ये वादाला सुरुवात झाली. आंदेकर कुटुंबाच्या आर्शिवादानेच गणेश कोमकर हा गुंडगिरी करीत होता. गणेश कोमकर याने स्वत:ची गँग तयार केली होती. आंदेकर यांच्या एका नातेवाईकाचा शनिवारी गणेश कोमकर याच्यासोबत वाद झाला होता. त्यात गणेश याला मारहाण झाली होती. त्याचा रागही गणेश याला होता. आंदेकर कुटुंबाकडून आमच्या जीवाला धोका आहे, असा अर्ज कोमकर कुटुंबाने समर्थ पोलीस ठाण्यात नुकताच दिला होता. ही सर्व पार्श्वभूमी वनराज आंदेकर याच्या खुनामागे असल्याचे दिसून येते.




