छत्रपती संभाजीनगर : पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ‘भारत एक खोज’मध्ये लिहिलेल्या वक्तव्याबद्दल उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार आहेत का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
काँग्रेसने मध्य प्रदेशात शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लाऊन पाडला. कर्नाटकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्यावर ठाकरे व शरद पवार हे मूग गिळून गप्प आहेत. एवढे वर्षे काँग्रेसने आम्हाला इतिहासात शिकवले महाराजांनी सुरत लुटली होती. महाराजांची सुरत लुटली नव्हती तर महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेण्यासाठी आक्रमण केले होते. पण महाराज जणू लूट करायला गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाला ज्या काँग्रेसने शिकवला त्यांना माफी मागायला सांगाल का, की केवळ खुर्ची करता त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात, असे फडणवीस म्हणाले. विधी विद्यापीठातील विद्यार्थिनींसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांतांच्या समन्वय समितीच्या बैठकीस त्यांनी हजेरी लावली.



