गणपती बाप्पाचे आगमन होण्यास आता काहीच दिवस बाकी आहेत. तर, आज 2 सप्टेंबररोजी श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. संपूर्ण श्रावण महिन्यात जवळपास बरेच जण हे मांसाहार टाळत असतात. त्यामुळे या काळात शाकाहारी भोजनाला अधिक प्राधान्य दिले जाते. श्रावण महिन्यात भाजीपालाचे दर वाढलेले दिसून आले.अजूनही भाजीपाला महागच आहे. यंदा सर्वच पदार्थांच्या किमतींत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाज्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत.
भाज्यांचे दर तब्बल 10 ते 20 टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळालं. अशातच सध्या कोथिंबीर आणि मेथीच्या जुडी तर विक्रमी दरात विकली जात आहे. काही बाजार पेठामध्ये कोथिंबिरीच्या एका जुडीला तब्बल 200 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाल्याचं पाहायला मिळालं.
कोथिंबिरीचे भाव भिडले गगनाला
तर मेथीच्या भाजीला 110 रुपये प्रति जुडी असा दर मिळत आहे. सध्या कोथिंबीर 20 हजार रुपये शेकडा तर मेथी10 हजार रूपये शेकडा भावाने विकली जात आहे. यामुळे सामान्य माणसाच्या जेवणातून या पालेभाज्या जणू गायबच झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या शेतमालामध्ये कोथिंबीर, मेथीचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याने त्याचे दर वाढले आहेत. पावसामुळे बाजारात या भाज्याची आवकच कमी झाली आहे. परिणामी ते विक्रमी भावाने विकले जात आहे.