वृत्तसंस्था, मॉस्को
बचाव पथकांनी रशियाच्या सुदूर पूर्वेला बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरचा शोध लावला असून त्यात २२ प्रवासी असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. यातील १७ जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू असल्याची माहिती रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिली.
रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘आरआयए नोवोस्ती’ने आपत्कालीन मंत्रालयाचा हवाला देत हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे. खराब हवामान आणि दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘एमआय-८’ या हेलिकॉप्टरने शनिवारी कामचटका प्रदेशातील वचकाझेट्स ज्वालामुखीजवळून उड्डाण केले होते. परंतु नियोजित वेळेला ते इच्छितस्थळी पोहोचले नसल्याचे रशियाच्या ‘फेडरल एअर ट्रान्सपोर्ट संस्थे’ने यापूर्वी एका निवेदनात म्हटले आहे. यात १९ प्रवासी आणि तीन क्रू-मेंबर्स होते. ‘एमआय-८’ हे १९६० च्या दशकात निर्मित केलेले तसेच दोन इंजिन असलेले हेलिकॉप्टर रशियामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जिथे वारंवार दुर्घटना घडतात, अशा भागांत तसेच शेजारील देश आणि इतर अनेक देशांमध्ये त्याचा वापर केला जातो.