पुनावळे : गेल्या काही दिवसांपासून आणि पावसामुळे पुनावळे व परिसरातील सेवा रस्त्यांना तळ्याचे स्वरूप झाले होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची येथून ये-जा करताना तारांबळ उडाली होती. पुणे-मुंबई महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुनावळे पुलाजवळील सेवा रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. रस्त्याची दुर्दशा एवढी खराब होती की परिसरातील नागरिकांनी महापालिकेला व स्थानिक नेत्यांना प्रचंड विरोध केला. त्यानंतर कुठे प्रशासनाचे व नेत्यांचे डोळे उघडले. परिसरात पावसाळ्यात खड्ड्यातून मार्ग काढल्यानंतर आत्ता रस्त्याची दुरुस्ती होताना दिसत आहे.
या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामुळे तसेच येथील वाहून गेलेल्या डांबरामुळे रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे होते याचा अंदाज येतो. पुनावळे परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प झाले आहेत त्यामुळे या भागात वसाहत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पुणे मुंबई महामार्ग लगत नामांकित शाळा, कॉलेजेस आणि शेजारी असणारे आयटी नगरी यामुळे येथे कामगारवर्ग, विद्यार्थी वर्ग, स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात वास्तव करत आहेत.
पुनावळ्याच्या पश्चिम भागात व मुंबई पुणे हायवेच्या सर्व्हिस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. पादचारी आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागलेली आहे. रस्त्यावरील पडलेल्या खड्यामुळे तसेच येथील वाहून गेलेल्या डांबरामुळे या रस्त्याचे कामात किती आर्थिक गैरव्यवहार झाला असेल याची कल्पना दिसून येते.
पुनावळे परिसरातील सुज्ञ नागरिकांनी सोशल मीडिया व प्रिंट मीडिया यांच्या माध्यमातून पालिका प्रशासन व राजकीय नेत्यांना जनतेसाठी असलेल्या कार्याची जाणीव करून दिली. त्यानंतर प्रशासनाला जागा आली आणि गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुनावळेकरांसाठी तात्पुरते का होईना डागडुजी करून रस्ते खड्डे मुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये राजकीय नेत्यांनी पावसाळ्यात पुनावळेकरांना होणाऱ्या त्रासाचा अंत पाहिला. महापालिकेला टॅक्स स्वरूपात लाखो रुपये या भागातून जमा होतात. त्यामुळे नागरिकांना सुविधा पुरवणे हे महापालिकेचे पहिले कर्तव्य आहे. या मलमपट्टीचे कोणत्याही नेत्यांनी राजकीय पोळी भाजून घेऊ नये. आम्हाला स्मार्ट सिटीत असल्यासारखे सुविधा द्या अशीच एक सामान्य पुनावळेकरांची अपेक्षा आहे.