पुणे : ढोल-ताशा पथकांच्या निनादातून झालेली नव्या तालाची आवर्तने, बँडपथकातील कलाकारांनी वाजविलेल्या भक्तिगीतांच्या मधुर सुरावटी, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अशा उत्सवी वातावरणात शनिवारी वाजत गाजत गणरायाचे स्वागत करण्यात आले.
मानाच्या गणपती मंडळांच्या गणरायाची मुहूर्तावर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील सर्व गणेश मंडळांनी पारंपरिक मार्गावर गणरायाच्या आगमनाची छोटेखानी मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये दोनदा पावसाची सर आल्यानंतरही कार्यकर्त्यांचा आणि पथकातील वादकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.
अकरा दिवसांच्या आनंदपर्वाची गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करून सुरुवात झाली. घरोघरी चैतन्यपूर्ण वातावरणात श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरातील गणरायाची प्रतिष्ठापना करून गुरुजींची मंडळांच्या गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेची वेळ गाठण्याची लगबग सुरू होती. पूजा साहित्य खरेदीबरोबरच हार, फुले, तुळस, शमी, केवड्याचे पान, कमळ, पाच फळांचा वाटा खरेदी करण्यासाठी मंडई परिसरात गर्दी झाली होती. घरातील गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकातील वादक युवक-युवती पारंपरिक पेहराव परिधान करून मंडळांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले.