नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून तातडीने मुक्त केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई केली आहे.
खेडकर यांच्यावर इतर मागासवर्गीय गटातून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी फसवणकू केल्याचा आरोप आहे. अपंगत्व कोट्यातून लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका आहे. मात्र, खेडकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
केंद्र सरकारने याबाबत ६ सप्टेंबरला आदेश दिला आहे. त्यात भारतीय प्रशासकीय सेवेच्या नियम १२अन्वये तातडीने सेवेतून मुक्त केल्याचे नमूद केले आहे. या नियमानुसार फेरपरीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही तर केंद्र सरकार प्रशिक्षणार्थींना सेवेतून मुक्त करू शकते किंवा जर केंद्र सरकारला प्रशिक्षणार्थी भरतीस पात्र नाही याची खात्री पटली याखेरीज सेवेसाठी योग्य नाही असे वाटले तर कारवाई करते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ३१ जुलै रोजी खेडकर यांची उमेदवारी रद्द करून भविष्यातील सर्व परीक्षांपासून त्यांना अपात्र ठरवले होते. खेडकर या महाराष्ट्र केडरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
काय होते आरोप
● खेडकर यांची प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात निवड झाली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता.
● ३ जून २०२४ रोजी खेडकर या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या. या ठिकाणी त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्या.
● खेडकर यांच्या वडिलांनी पूजा यांना विविध प्रकारच्या सुविधा देण्याबाबत सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारांना अयोग्य शब्दप्रयोग वापरणे.
● अपर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खासगी दालनातील साहित्य बाहेर काढून तेथे स्वत:चे कार्यालय स्थापन करणे आदी गैरवर्तणूक केली.
● खेडकर यांच्या प्रशिक्षण कालावधीतील गैरवर्तणुकीबाबत तपशीलवार अहवाल डॉ. सुहास दिवसे यांनी सामान्य प्रशासन विभागाला पाठविला होता.
● त्यानंतर राज्य शासनाने त्यांचे पुण्यातील उर्वरित प्रशिक्षण स्थगित करून त्यांची रवानगी वाशिम जिल्ह्यात केली.
● जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालावर खेडकर यांनी राज्य शासनाला केलेल्या खुलाशात जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्यावरच आरोप केले होते.
● याप्रकरणी पुणे पोलिसांनी खेडकर यांना जबाबासाठी पाचारण केले होते. मात्र, त्या हजर राहिल्या नाहीत. जुलै महिन्यात त्यांचे वाशीम जिल्ह्यात प्रशिक्षण स्थगित करण्यात आले.