पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा बहाणा करत तसेच नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे आश्वासन देऊन एकाची ४८ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
हा प्रकार ६ जून ते ६ सप्टेंबर या कालावधीत चिंचवड येथील कृष्णानगरमध्ये घडला. सुरज बलभीम जमधडे (वय ३७, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे.
टीआरपीएफ अॅपवरील मोबाईल क्रमांकधारका
विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिरी मार्केट या शेअर मार्केटच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर फिर्यादी ट्रेडिंग करत असताना त्यांना जास्त लाभांश देण्याचे तसेच नुकसान होत असेल तरीही त्याची भरपाई देऊ असा बहाणा आरोपींनी केला. त्यानंतर फिर्यादी यांना टीआरपीएफ टोकन ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले त्यांना एका व्हाटसअॅप ग्रुपमध्ये जॉईन करून घेत तिथे त्यांना पैसे भरण्यास सांगितले.
टीआरपीएफ टोकन ट्रेडिंग या अॅपवर यूएस डॉलरद्वारे जास्त नफा झाल्याचे भासवून त्यांना आणखी वारंवार वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगून त्यांच्याकडून ४८ लाख ६१ हजार रुपये रक्कम घेतली. त्यानंतर त्यांना कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. फौजदार देवकुळे तपास करीत आहेत.