नवी दिल्ली ; कुस्तीगीर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरियाणा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या दृष्टीने हा दिलासा मानला जातो.
फोगट आणि पुनिया यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस मुख्यालयात सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व हरियाणा काँग्रेस प्रभारी दीपक बाबरिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांना बुधवारी भेटल्यानंतर रेल्वेने विनेशला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी केला. सेवेच्या अटींचा भंग केल्याचा आरोप असल्याचे सूत्रांनी नमूद केले. काँग्रेससाठी हा अभिमानाचा दिवस आहे. खेळाडूंनी जेव्हा आंदोलन केले तेव्हा सारा देश त्यांच्या मागे उभा राहिल्याचे वेणुगोपाल यांनी नमूद केले.
कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपने पाठिंबा दिला तर काँग्रेसने आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांना पाठिंबा दिल्याचे विनेशने नमूद केले. गेल्या वर्षी ब्रिजभूषण यांच्याविरोधात जे आंदोलन झाले त्यामध्ये पुनिया तसेच फोगट सहभागी झाले होते.
विनेश फोगट यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांना रेल्वेकडून कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. राजकीय नेत्यांना भेटून सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचे नोटीसमध्ये नमूद केले़ मात्र ही नोटीस मिळाल्यानंतर विनेशने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला.
- काँगेसचे षडयंत्रब्रिजभूषण
काँग्रेसचे माझ्याविरोधात षडयंत्र रचले होते प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार ब्रिज भूषण यांनी व्यक्त केली आहे. हरियाणातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिपेंदर हुडा तसेच भुपिंदर हुडा यांचा यात प्रमुख सहभाग होता असा आरोपही त्यांनी केला.