मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. येत्या १० ते १५ दिवसात निवडणूक आयोग यासंबंधी पत्रकार परिषद घेत वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजप विधानसभेला १६० जागा लढणार असल्याची माहिती मिळत आहे.
अद्याप महायुतीत जागावाटप निश्चित झालेले नाही. परंतु भाजपने १६० जागांची तयारी केल्याची माहिती मिळत आहे. घटस्थापना झाल्यानंतर म्हणजेच ३ ऑक्टोबरनंतर भाजपची पहिली यादी जाहीर होऊ शकते. यात ५० उमेदवारांचा समावेश असण्याची चिन्हं आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीत जितक्या जागा लढल्या, तितक्याच जागा लढण्याच्या मानसिकतेत पक्ष आहे. भाजप नेत्यांमध्ये १६४ जागा लढण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजप १६० हून अधिक जागा लढणार असल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या वाट्याला मिळून १२५ ते १३० जागा येण्याची शक्यता आहे. यात अन्य घटकपक्षांनाही सामावून घ्यावे लागणार आहेत. अजितदादा ७० जागांवर ठाम आहेत. तर एकनाथ शिंदेही ८० जागांच्या तयारीत आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन वादंग निर्माण होऊ शकतो.



