महापालिकेच्या फ क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार टपरी, पथारी, हातगाडी व्यावसायिकांना डोकेदुखी ठरत आहे. कृष्णानगर भाजी मंडई येथे बुधवारी (दि. २५) फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अन्यायकारक कारवाई सुरू होती. ही कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या वाहनांना टपरी, पथारी हातगाडी पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी खो घातला. अन्यायकारक कारवाई थांबवण्यासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला. टपरी, पाथरी, हातगाडी पंचायत विभागीय महिला अध्यक्ष नाणी गजरमल व शहर कार्याध्यक्ष इम्तियाज मामू बागवान, यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण पथकाची गाडी अडवण्यात आली. टपरी, पथारी, हातगाडीधारकांना महापालिकेने सर्व्हे केला आहे. मात्र काहींना अद्याप परवाने दिले नाहीत.
हातावरचे पोट असल्याने कष्ट करून अनेक जण आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र त्यांना महापालिकेच्या चुकीच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कृष्णानगर भाजी मंडई येथे ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे कर्मचारी वाहनासह दाखल झाले होते. व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करत साहित्य, माल जप्त केला. या अन्यायकारक कारवाईचा टपरी, पथारी, हातगाडी पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची वाहने अडविली. आमचे साहित्य, माल परत देण्याची मागणी केली. ‘टपरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘हातगाडी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, आमचा माल परत करा, परत करा, गोरगरिबांच्या जगण्यावर गदा आणू नका. आम्हाला न्याय द्या, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
दरम्यान टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे बाबा कांबळे, बळीराम काकडे, प्रकाश यशवंत रमेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी रस्त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना देखील क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर गोरगरीब, कष्टकरी मागासवर्गीय, बहुजनांना त्रास देण्यासाठी मनमानी पद्धतीने अतिक्रमण कारवाई केली, असे व्यावसायिकांनी सांगितले.