
नाशिक : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व कुख्यात गँगस्टर अबू सालेम सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गुरुवारी सकाळी त्याची मैत्रीण हीना ही त्याला भेटण्यासाठी नाशिकरोड कारागृहात आली होती. तिच्यासोबत आणखी एक जण असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास समजताच त्यांनी कारागृह गाठून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अबू सालेमला भेटण्यासाठी आलेल्या दोघांची गेल्या 20 तासांपासून चौकशी सुरु आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गँगस्टर अबू सालेम यास भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या मैत्रीणीसह एका परदेशी व्यक्तीला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. दोघांना कडेकोट बंदोबस्तामध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दोघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यावेळी एटीएससह राज्य गुप्तचर विभागाचेही पथक आणि शहर गुन्हे शाखेचे पथकही उपस्थित होते.
एटीएसच्या चौकशीत काय समोर येणार?
आता गेल्या 20 तासापासून एटीएसकडून ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी सुरु आहे. हीना ही सालेम यास भेटण्यासाठी का आली, तिच्या भेटीमागील उद्देश तसेच यापूर्वीचे तपशीलही चौकशीतून घेण्यात येत आहेत. हीना सोबत असलेला परदेशी व्यक्ती हा नागपूरच्या गुंडाला भेटण्यासाठी आल्याचे चौकशीत सांगितल्याचे समजते. अबू सालेमला भेटण्यासाठी आलेल्या या परदेशी नागरिकाकडून आणि महिलेकडून एटीएसला काय माहिती मिळते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अबू सालेमला काही दिवसांपूर्वी हलवले होते दिल्लीला
दरम्यान, अबू सालेमचा मुक्काम नाशिकरोड कारागृहात आहे. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमचा नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी मात्र दोन दिवसांपूर्वी अबू सालेमला महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यासाठी कडेकोट बंदोबस्तात दिल्ली येथे हलवण्यात आले होते. 2002 मध्ये खंडणी मागितल्या प्रकरणी दिल्लीच्या पटीयाला कोर्टात अबू सालेमला हजर करण्यात आले होते. यावेळी नाशिकरोड कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच, ब्लॅक कॅट कमांडोदेखील सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आले होते. यामुळे नाशिकच्या रेल्वेस्टेशनसह जेलरोड परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.



