
अमरावती : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुरुवारी अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांचा पदावरून पायउतार केल्यामुळं नाराज पदाधिकाऱ्यांनी बंड केला.
जिल्हाध्यक्षांचा केला पायउतार : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदार संघाची प्रमुख जबाबदारी होती. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून काढून त्यांच्यावर प्रदेश संघटन सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आली. विश्वासात न घेता आपल्याला पदावरून काढलं, अशी नाराजी प्रदीप राऊत यांनी व्यक्त केली.
स्थानिक नेत्यांवर आरोप : आपल्याला जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्याचा जो काही निर्णय घेण्यात आला, त्यासाठी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, विधानसभेचे माजी उपसभापती शरद तसरे, प्रकाश बोंडे हे नेते जबाबदार असल्याचा आरोपही प्रदीप राऊत यांनी केला. पक्ष वाढीसाठी शून्य कर्तृत्व असणाऱ्या या नेत्यांनी वरिष्ठांची कान भरणी केली, असं देखील प्रदीप राऊत यांनी म्हटलं आहे.
