नवी दिल्ली: आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मागणी करण्यात आली होती. तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्पष्ट दिसतो तर त्याचा आकार वाढवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती, तर आम्ही ती मागणी मान्य केली आहे. तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे मोठा दिसेल तसेच पिपाणी चिन्हाला बंदी नाही असे राजीव कुमार, केंद्रीय निवडणूक आयुक्त यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला देण्यात आलेल्या ‘पिपाणी’ चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसला. त्यामुळे मतदारामध्ये चिन्हाबाबत शंका निर्माण झाली आणि शेकडो मतदारांनी तुतारी या चिन्हा ऐवजी पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला मतदान केले. त्यानंतर शरद पवार यांनी ‘पिपाणी’ या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती.



