पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
एकीकडे जागावाटपाबाबत चर्चा सुरु असताना भाजपच्या विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत विरोध पाहायला मिळत आहे. चिंचवड विधानसभेत जगताप कुटुंबियांच्या घराणेशाही विरोधात भाजपातील माजी नगरसेवक एकवटले आहेत. जगताप कुटुंबियांना भाजपकडून उमेदवारी देण्यास या नगरसेवकांचा विरोध आहे.
या मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपकडून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आणि त्या सध्या विधानसभेवर चिंचवड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील अश्विनी जगताप किंवा त्यांचे दीर शंकर जगताप यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र भाजपच्याच काही माजी नगरसेवकांनी बैठक घेत चिंचवड विधानसभा क्षेत्रातील जगताप कुटुंबीयांच्या घराणेशाहीला विरोध केला आहे. यात भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, शत्रुघन काटे, राम वाकडकर आणि माधुरी कुलकर्णी अशा काही प्रमुख नगरसेवकाचा विरोध आहे.




