मुंबई : विधानसभा निवडणुका राज्यात केव्हा लागू होणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चा होत होती. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. राज्यात सद्यस्थितीत असलेल्या महायुती आघाडीमध्ये आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीकडे किती संख्याबळ आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये काय परिस्थिती राहील, हे पाहणं औत्सुक्याच आहे.
महायुतीचं संख्याबळ : 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून 105 जागा जिंकून समोर आला होता. त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये होती. त्यावेळी शिवसेनेला 56 जागा जिंकता आल्या होत्या. तर विरोधात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 54 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर तर 44 जागा जिंकून काँग्रेस चौथ्या स्थानावर होती.
राजकीय भूकंप : मात्र, सत्तेची सर्व गणित बदलत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी सत्ता स्थापन केली. तर भाजपा पक्ष विरोधात बसला. त्यानंतर भाजपानं शिवसेना पक्षाला फोडत शिंदे गट सोबत घेतला आणि नव्यानं सरकार स्थापन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फाटा फूट होऊन अजित पवार 40 आमदारांसह बाहेर पडून पुन्हा सत्तेमध्ये बसले.
महायुतीमध्ये पुन्हा फाटा फूट : दरम्यान, महायुतीमधील राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रहार या दोन संघटना बाहेर पडल्या असून या दोन संघटनांनी पुन्हा आपला सवता सुभा उभा केला आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत सध्या दोन्ही आघाड्यांचं पारडं समसमान असून कोणती आघाडी सत्ता स्थापन करते याकडे आता मतदारांचं लक्ष लागलं आहे.
2019 च्या निवडणुकीनंतरचं पक्षीय बलाबल
- भाजपा – 105
- शिवसेना – 56
- राष्ट्रवादी – 54
- काँग्रेस – 44
- एआयएमआयएम – 2
पक्षफुटीनंतरचं पक्षीय बलाबल
महायुती
- भाजपा – 105
- शिवसेना (शिंदे) – 40
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) – 41
महाविकास आघाडी
- काँग्रेस – 44
- शिवसेना (ठाकरे) – 14
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) – 14
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १६४ जागा लढवून सर्वात जास्त १०५ जागा जिंकल्या होत्या, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने १२४ जागा लढवून ५६ जागांवर विजय मिळवला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ तर काँग्रेसने ४४ जागी विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न भेटल्याकारणाने आणि सरकार स्थापन करण्यास कुणीही पुढाकार न घेतल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अखेर २३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु २६ नोव्हेंबर २०१९ रोजी फ्लोअर टेस्ट पूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. २९ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.


