नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या आगावू आरक्षणाच्या कालावधीमध्ये रेल्वेने मोठी घट केली आहे. आता १२० दिवसांऐवजी प्रवासाच्या केवळ ६० दिवस आधी आरक्षण करता येणार आहे. १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.
३१ ऑक्टोबरपर्यंत १२० दिवस आधी झालेल्या आरक्षणांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. रेल्वे मंडळाने जारी केलेल्या एका परिपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. ताज एक्सप्रेस, गोमती एक्सप्रेस यासारख्या काही गाड्यांना यापूर्वीच आगावू आरक्षणाचा कालावधी कमी आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच परदेशी नागरिकांसाठी असेलल्या ३६५ दिवसांची मर्यादा यापुढेही कायम असेल. २५ मार्च २०१५ रोजी रेल्वे मंत्रालयाने आरक्षणाची मर्यादा ६० दिवसांवरून १२० दिवस केली होती. आता सुमारे १० वर्षांनी पुन्हा एकदा केवळ दोन महिने आधीच आरक्षण करणे शक्य होणार असले, तरी या बदलामागे कोणतेही कारण रेल्वेने दिलेले नाही.



