मुंबई : विद्यार्थ्यांवरील ताण, दप्तराचे ओझे कमी करताना विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचे ओझे… अशा गेली वर्षानुवर्षे होणाऱ्या चर्चा या नव्या अभ्यासक्रम आराखड्यात कागदोपत्रीच राहिल्याचे दिसते आहे. विद्यार्थ्यांवरील विषयांचा भार नव्या आराखड्यात वाढणार आहे. आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना १५ विषय अभ्यासावे लागणार आहेत. त्यातील समाजशास्त्र विषयांची एकत्रित परीक्षा असल्याने परीक्षा १२ विषयांची होणार आहे. सकाळी शाळा, खासगी शिकवणी, प्रवेश परीक्षांची तयारी असा विद्यार्थ्यांचा तणावपूर्ण दिनक्रम आता अधिकच आव्हानात्मक होणार आहे.
विषय कोणते?
व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण आणि आंतरविद्याशाखा विषय बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे तीन भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेले तीन विषय असे दहा विषय असतील.स्काऊट, गाईड बंधनकारक करण्यात आले आहे. याचबरोबर रस्ता सुरक्षा (आरएसजी), समाजसेवा (एनएसएस) संरक्षण (एनसीसी) यांतील एक श्रेणी विषय विद्यार्थ्यांना अभ्यासावा लागेल. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आंतरविद्याशाखा विषयांत नववीसाठी समाजातील व्यक्ती तर दहावीसाठी पर्यावरण विषय अभ्यासावा लागेल.



