पुणे : महायुती आणि महाविकास आघाडीचे काही मतदारसंघाबाबत अद्यापही एकमत झालेले नसतानाही उमेदवारी मिळेल, या शक्यतेने इच्छुकांची ना हरकत प्रमाणपत्रासाठी धावपळ सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसे प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यताही वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून, आजपासून (मंगळवार, २२ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी, जागांवर एकमत होत नसल्याने आणि उमेदवार निवडीचा पेच कायम राहिल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, जिल्ह्यातील सर्वच इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविले आहे.
महायुतीमध्ये वडगावशेरी मतदारसंघ भाजपला मिळणार की, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मिळणार, याबाबत संदिग्धता कायम आहे. मतदारसंघावरून एकमत न झाल्यास येथे मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपचे संभाव्य उमेदवार जगदीश मुळीक यांच्याबरोबरच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे यांनीही प्रमाणपत्र घेतले आहे. हडपसरमधून आमदार चेतन तुपे यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. मात्र, त्यांनीही प्रमाणपत्र मिळविले आहे.
अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले दौंडचे माजी आमदार रमेश थोरात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात जाणार आहेत. त्यांनीही प्रमाणपत्र घेतल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशावरही यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये पर्वती मतदारसंघावरून पेच निर्माण झाला आहे. पर्वतीच्या जागेवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने दावा केला आहे. तर, काँग्रेसलाही हा मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमहापौर आबा बागुल यांनीही प्रमाणपत्र घेतले असून, पर्वतीच्या विद्यामान आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनीही प्रमापत्र घेतले आहे.



