नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळाबाहेब ठाकरे पक्षाकडून बुधवारी (23 ऑक्टोबर) रात्री 65 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात उरण विधानसभा मतदार संघातून मनोहर भोईर यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र, याच मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षानं देखील उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं दोन्ही गटातील द्वंद्वाचा फायदा म्हणून भाजपाला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आघाडीतील बिघाडीचा फायदा भाजपाला होणार?
महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असलेल्या शेतकरी कामगार पक्षानं उरण विधानसभा मतदारसंघात प्रितम म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं महाविकासआघाडीत बिघाडी झाली आहे. तसंच शेकापच्या या निर्णयामुळं महाआघाडीची मतं वाटली जाणार असल्यानं याचा थेट फायदा भाजपाचे उमेदवार महेश बालदी यांना होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.


