पिंपरी: आज महाविकास आघाडीने चिंचवड विधानसभेसाठी राहुल कलाटे यांची उमेदवारी जाहीर केली. पोटनिवडणुकीत नाना काटे यांनी ९९ हजार ४३५ मत मिळवून देखील महाविकास आघाडीची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होऊन अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. तरीही चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणेच आता जगताप, काटे आणि कलाटे यांच्यात जोरदार लढत होणार आहे. नाना काटे यांच्यासोबत अजित पवार गटाचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी असणार असल्याने ही लढत अधिकच हाय होल्टेज होणार आहे.
राहुल कलाटे यांना पोटनिवडणुकीत ४४,११२ हजार मतदान मिळाले होते, त्याच बरोबर त्यांना महाविकास आघाडीतील मतदानाचा फायदा होणार आहे. पोटनिवडणुकीत महायुतीकडून स्व. आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना १,३५,६०३ मतदान मिळवून विजय मिळवला होता. आता विधानसभेसाठी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याने भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठबळ मिळणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पोटनिवडणुकी प्रमाणे ही निवडणूक रंगणार असल्याचे स्पष्ट आहे. उद्या सोमवारी सर्वच उमेदवार आपले उमेदवारी अर्ज भरणार आहेत. चिंचवड मध्ये पुन्हा 2022 ची पुनरावृत्ती झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काय घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




