
पुणे : पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी सर्वांत कमी दोन लाख ८३ हजार ६३५ मतदार कसबा विधानसभा मतदारसंघात आहेत. मात्र, या मतदारसंघातील महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघातून नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांवर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहरात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ या आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आठपैकी सर्वांत कमी मतदारसंख्या असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. या मतदारसंघात एक लाख ३९ हजार ९४४ पुरुष मतदार आहेत, तर एक लाख ४३ हजार ६५४ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात पुणे शहरातील महत्त्वाच्या कसबा पेठ, सोमवार पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, खडकमाळ आळी, नवी पेठ या भागाचा समावेश होतो. मतदारसंघात प्रामुख्याने सुशिक्षित आणि ज्येष्ठ मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मनसेने गणेश भोकरे यांना उमेदवारी दिली आहे.
- शहरात ३३ लाख ८१ हजार ३८४ मतदार
शहरातील आठ मतदारसंघांमध्ये ३३ लाख ८१ हजार ३८४ मतदार आहेत. त्यांपैकी सर्वाधिक सहा लाख २५ हजार ६७५ मतदार हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. त्या पाठोपाठ खडकवासला मतदारसंघात पाच लाख ७६ हजार ५०५, वडगाव शेरीत पाच लाख ३ हजार ५३९, कोथरूड चार लाख ४० हजार ५५७, पर्वती तीन लाख ६० हजार ९७४, पुणे कॅन्टोंन्मेंट दोन लाख ९५ हजार ३८२, शिवाजीनगर दोन लाख ९५ हजार १४७ आणि कसबा पेठमध्ये दोन लाख ८३ हजार ६३५ मतदार आहेत.



