पुणे : ‘राजाराम सहकारी साखर कारखान्यास १ हजार ४४२ कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचे विधान जयंत पाटील यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून भाजपवर टीका सुरू करण्यात आली आहे,’ असे प्रत्युत्तर केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केली. ‘अभिनेता रितेश देशमुख यांचे बंधू आणि काकांच्या कारखान्यालाही मदत करण्यात आल्याचे देशमुख विसरले आहेत,’ अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांची भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र केंद्रात बैठक झाली. त्या वेळी त्यांनी जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. ‘केंद्र सरकारने फक्त महायुतीच्या नेत्यांच्या कारखान्यांना मदत केली,’ असा आरोप पाटील यांनी केला होता. त्यावर, ‘राज्यात सहकार अधिक समृद्ध व्हावा, यासाठी १० हजार कोटींचा प्राप्तिकर माफ केला आहे. साखर उद्याोग अधिक मजबूत व्हावा, हा यामागचा हेतू आहे. केंद्र सरकारने सर्वांना सरसकट मदत केली आहे. ती करताना कोणता कारखाना कोणाचा आहे, हे पाहिले नाही,’ असे मोहोळ म्हणाले.
ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सत्तेत न येण्याच्या भीतीमुळे जाहीरनाम्याच्या माध्यमातून खोटी आश्वासने देत आहे. लाडकी बहीण योजना, वीज बिल माफीबाबत त्यांनी सुरुवातीला टीका केली. मात्र, आता योजनांची चोरी केली आहे.’




