)
मुंबई : राज्यातील निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेते मंगळवारी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या चिमूर (दुपारी १२), सोलापूर (दुपारी २) जाहीर सभा होणार आहेत. सायंकाळी ४ नंतर पुण्यात मोदी यांची प्रचारफेरी आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबतईतील घाटकोपर आणि कांदिवलीमध्ये दोन जाहीर सभा होणार आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तसेच गोंदियामध्ये होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये प्रचारात सहभागी होणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्या आज पाच सभा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या मंगळवारी जिल्ह्यात पाच मतदारसंघात जाहीर सभा होणार आहेत. जिल्ह्यात या निवडणुकीत कोणत्याही नेत्याने एकाच दिवशी इतक्या सभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाशी संबंधित आमदारांच्या मतदारसंघांवर पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे.



