“बहिण म्हणून मी अजित पवारांना एकटं पडू देणार नाही”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांनी केलं आहे. “अजितला एकटं पडू देऊ नका, एकटं पाडू नका, असं आमच्या आईने सांगितलं आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत. येत्या २३ तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि अजित पवार या निवडणुकीत पुन्हा एकदा बारामतीमधून निवडून येतील”, असा विश्वास विजया पाटील यांनी व्यक्त केला. तसेच “शरद पवारांबाबत किंवा त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही, कारण ते आमचे दैवत आहेत”, असेही पाटील म्हणाल्या.
विजया पाटील म्हणाल्या, “लोकसभेला सुप्रिया (खासदार सुप्रिया सुळे) आणि विधानसभेला अजितदादा (उपमुख्यमंत्री अजित पवार) अशी बारामतीकरांची अनेक वर्षांपासूनची भूमिका आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत आम्ही अजित पवारांच्या बाजूने प्रचार केला नाही. मात्र विधानसभेत गेल्या ३५ वर्षांपासून अजित पवार काम करत आहेत आणि तेच बारामतीसाठी योग्य उमेदवार आहेत. आमची आई सांगते, माझ्या अजितला एकटं पाडू नका. तिने अजित पवारांचे कष्ट पाहिले आहेत. त्यांनी बारामतीसाठी काम केलं आहे. अजित पवारांची देखील बारामतीबाबतची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे बारामतीकर अजित पवारांवर विश्वास दाखवतील कारण ते सुज्ञ आहेत”. विजया पाटील या बोलत होत्या.
अजित पवारांच्या मदतीसाठी बहीण धावून आली
अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील म्हणाल्या, “बारामतीकर शरद पवारांवर प्रेम करतात त्यांनी याआधीच ठरवलं आहे, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा… या निवडणुकीतही तसंच होईल आणि तसंच व्हावं असं आम्हाला वाटतं. मी अजित पवारांच्या प्रचारानिमित्त बारामतीमध्ये फिरले. बारामतीकरांशी बोलताना मला जाणवलं की या तालुक्याला, या मतदारसंघाला अजित पवारांशिवाय पर्याय नाही लोकसभेला त्यांनी नक्कीच सुप्रिया सुळे यांना मतदान केलं आहे. शरद पवारांच्या प्रेमापोटी आणि सुप्रिया सुळे यांच्या कामामुळे बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास दाखवला. मात्र, विधानसभेला ते अजित पवारांवर विश्वास दाखवतील यात शंका नाही. अजित पवारांनी बारामतीकरांना स्वप्न दाखवलं. बारामतीला देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ बनवायचा आहे. त्यासाठी बारामतीकर अजित पवारांनाच मतदान करतील यात शंका नाही


