नाशिक : एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आता भाजपसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी निधन झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, येथेही त्यांनी पदे भूषवली, दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सने ते दिल्ली येथे गेले होते. भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नव्हते. मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते.
दिंडोरीतून दोन वेळा खासदार
हरिश्चंद्र चव्हाण यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2014 मध्ये त्यांनी भारती पवार यांचा 2 लाख 47 हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. दरम्यान, 2019 मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र पवार यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी 1 लाख 98 हजार 779 मतांनी विजय मिळवला होता.



