
अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचं टार्गेट दिल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्या समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या अहवालाची मागणी केली होती. मात्र हा अहवाल समोर आलेला नाही. अशातच निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता असं चांदिवाल यांनी म्हटलं आहे. यावर आता स्वतः फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, “मला त्या सगळ्याची कल्पना आहे. त्या लोकांनी (देशमुख व वाझे) मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला होता.
चांदीवाल म्हणाले, “२७ एप्रिल २०२२ रोजी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एक अहवाल सोपवला होता. त्यामध्ये आम्ही मांडलेले मुद्दे कुठल्याही सरकारच्या पचनी पडणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे माझा अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा. तसेच, अहवाल बनवण्यासाठी मला शासकीय अधिकाऱ्यांनी पुरेशी मदत केली नाही हे वास्तव आहे. या सगळ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मला ते सगळं माहिती आहे. त्या लोकांनी (देशमुख, वाझे व मविआ) मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्यांनी असे प्रयत्न केले. परंतु, ईश्वर माझ्या पाठिशी आहे, जनता माझ्या पाठिशी आहे.
चांदीवाल नेमकं काय म्हणाले होते?
अनिल देशमुख, पलांडे, परमबीर सिंग यांना आम्ही दंड भरायला लावला होता. आम्हाला जे शपथपत्र दिलं होतं त्यानुसार सचिन वाझेंनी पुरावे दिले असते तर बराच खुलासा झाला असता. त्यांच्या शपथपत्रात त्यांनी दोन राजकीय व्यक्तींची नावं घेतली होती. आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख केला होता. ती नावं होती अजित पवार आणि शरद पवार. मी त्यांना ही नावं रेकॉर्डवर घेणार नाही, असं सांगितलं. नियमांत बसत नसल्याने मी ते रेकॉर्डवर घेतलं नाही. देवेंद्र फडणवीस हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. सचिन वाझे व अनिल देशमुख यांनी फडणवीसांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यावेळी हे बोललो नाही कारण चर्चा करण्याला कारण मिळतं. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःची प्रसिद्धी नको होती. त्यामुळे मी त्यावेळी काही बोललो नाही, असं चांदीवाल म्हणाले



