नाशिक: दिवाळीच्या काळात बाजार समित्यांमध्ये आठवडाभर बंद असलेली कांद्याची खरेदी-विक्री, गेल्या उन्हाळी हंगामात कांद्याच्या उत्पादनात झालेली घट, संपलेला हंगाम आणि परतीच्या बिगर मोसमी पावसामुळे काढणीला आलेला खरीप हंगामातील कांदा सडल्यामुळे कांद्याची खरेदी-विक्रीची साखळी विस्कळीत झाली आहे. परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले.
बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कांदा शंभर रुपये किलोवर गेला आहे. दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत असून शेतकरी आणि ग्राहकांची लूट सुरू आहे. अजून महिना-दीड महिने तरी दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे. यंदा उन्हाळी हंगामात पाण्याचा तुटवडा, अतिउष्णता आणि अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा फारसा शिल्लक नाही. खरीप हंगामातील कांद्याची काढणी आता सुरू झाली आहे. पण, परतीच्या आणि बिगरमोसमी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. उन्हाळी कांद्याचा हंगाम संपला आहे आणि खरीप कांद्याची पुरेशी आवक होत नसल्यामुळे दरात तेजी आली आहे. जानेवारपासून उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दरात दिलासा मिळेल, अशी माहिती कांदा व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
कांद्याचा राखीव साठा कुठे गेला?
केंद्र सरकारने ग्राहकांना स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. साधारण १६०० ते ३००० रुपये क्विंटल दराने हा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला होता. हा कांदा कुठे आहे, असा प्रश्न शहरी ग्राहकांनी सरकारला विचारला पाहिजे असे मत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे.



