
मुळशी : काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे हे खोटे निष्ठावंत सत्ता, खुर्ची आणि पैसा याच्याशी त्यांची निष्ठा आहे. मंत्रिपद न मिळाल्यावर काँग्रेस हाऊस फोडणारे थोपटे निष्ठावंत कसले ? अशी पलटवार महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी आज केला.
भोर विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांची प्रचाराची सांगता सभा माण येथे पार पडली. त्याआधी पिरंगुट, भुकूम, भुगाव, कोंडावळे, या गावांमध्ये घरोघरी यांनी भेट दिली. महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी मांडेकर यांचे जल्लोषात स्वागत केले. या सभेला माजी आमदार शरद ढमाले, वासुदेव काळे, प्रदीप गारटकर, बाळासाहेब चांदेरे, श्रीकांत कदम, नंदू भोईर, सागर आढाव, कपिल बुचडे, राम बोडके, शांताराम इंगवले, भाऊ मरगळे, दीपक करंजावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मांडेकर म्हणाली की, थोपटे हे सत्तेसाठी भाजप प्रवेश करणार होते. पण तिथे त्यांची डाळ शिजली नाही. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी छुपी भेट घेतली. ही गुपित भेट बाहेर पडल्यावर थोपटे यांनी घुमजाव केला. डखोर उमेदवारांनी महायुतीचा धर्म पाळायला हवा होता. मतदार संघातील लोक घराणे शाहीला कंटाळले आहेत लोकांना बदल हवा आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अपक्षांना निवडून देणे म्हणजे काँग्रेसला निवडून देण्यासारखा आहे त्यामुळे अपक्षांना मतदान करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी गावकऱ्यांना केले. निवडणुकीला दोन दिवस राहिलेले असताना कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन ही मांडेकर यांनी केलं.




