विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता थांबला आहे. कारण उद्या महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच आता महाराष्ट्रात दोन प्रमुख आघाड्यांमध्ये ही लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधाऱ्यांसमोर एकप्रकारे मोठं आव्हानच असणार आहे.
- मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देणार?
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे अनेक दिवसांपासून करत आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांनी अनेकदा उपोषणं आणि ठिय्या आंदोलनं देखील केलं आहे. यावेळी मराठा समर्थकांनी पोलिसांच्या लाठ्यादेखील खाल्ल्या आहेत. मात्र तरी देखील त्यांनी आंदोलन मागे घेतलं नाही.
याशिवाय महायुती सरकारला त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं लागलं आहे. कारण मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर महायुती सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देणार असल्याचं देखील जाहीर केलं आहे. याप्रकरणी प्रक्रिया देखील सुरू केली होती. मात्र, ती प्रक्रिया काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही. अगदी त्यामुळेच मनोज जरांगे यांनी त्यांचं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे.
- मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे
मात्र अशातच आता राज्यात निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीनंतर जे सरकार सत्तेत बसेल ते तरी मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करेल का असा प्रश्न सर्व समाजाला पडला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणावर एक भाष्य केलं आहे.
जर राज्यात महायुतीचं सरकार आलं तर मनोज जरांगे यांनी केलेल्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत ते म्हणाले की, कायद्याच्या निकषात व कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. तसेच मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे इतर समाजांवर देखील अन्याय करण्याची आवश्यकता नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.



