पुणे : गेल्या काही दशकांत दलित, ओबीसी जागृत झाले. आता महिला जागृत होऊ लागल्या आहेत. आतापर्यंत महिला घरातील पुरुषांच्या सल्ल्यानुसार मतदान करत होत्या. ही परिस्थिती बदलत आहे. डोक्यावरचा पदर थोडा बाजूला होत आहे. पैसा हाती येणे हे महिलांसाठी सबलीकरण आहे. हे शतक देशातील महिलांचे आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी मांडले.
सिम्बायोसिसतर्फे ‘पॉलिटिकल डिसिजन मेकिंग अॅट द टॉप – ग्रोईंग चॅलेंजेस’ या विषयावर आयोजित दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानात चौधरी बोलत होत्या. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मजुमदार, कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण, लतिका पाडगावकर, अभय वैद्या या वेळी उपस्थित होते.
चौधरी म्हणाल्या, की राज्यात ७५०० रुपये महिलांना हाती आले. या पैशांतून महिलांनी भाजी, साडीविक्री असे व्यवसाय सुरू केले. महिलांनी महायुतीला मतदान करण्याचे ठरवले. त्यामुळे मतदानात महिलांचा टक्का वाढला. आता कोणतेही सरकारला ही योजना बंद करणे कठीण आहे. स्थानिक पातळीवर ही परिस्थिती असली, तरी या योजनेमुळे सरकारच्या अन्य महत्त्वाच्या योजनांना फटका बसणार असल्याचे मंत्रालयातील अधिकारी सांगतात. त्या बाबतीत निर्णयप्रक्रिया, धोरणांवर काम करण्याची गरज आहे.