पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी ( 9 डिसेंबर) अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आला आणि मारेकरी फरार झाले. एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाचे दिवसाढवळ्या झालेले अपहरण आणि हत्या यामुळे पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ माजली. मात्र या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अथक तपास करत अखेर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून या खुनाचा उलगडा झाला आहे.
सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व्यक्तीनेच त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. एका वैयक्तिक वादातून त्याने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे समोर आले आहे. अक्षय जवळकर असे मुख्य आरोपीचे नाव असून तोच या हत्येचा सूत्रधार आहे. त्यानेच वाघ यांच्या खुनासाठी पाच लाख रुपयांची सुपारी मारेकऱ्यांना दिली होती अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
याप्रकरणी भाडेकरूसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.पोलिसांनी पवन श्यामकुमार शर्मा (वय 30, रा. शांतीनगर, धुळे ), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 32, रा. अनुसया पार्क, वाघोली), अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे अशा चौघांना ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.



