मुंबई : नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीने छगन भुजबळ, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, धर्मरावबाबा अत्राम या नेत्यांना मंत्रिपदाची संधी दिली नाही. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचं पाहायला मिळालं.
मात्र, नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दखल घेतली आहे. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. नुतन मंत्री मकरंद पाटील यांचे भाऊ खासदार नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभा देण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
मंत्रीमंडळ विस्तारात काही जुन्या मंत्र्यांना डच्चू
आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात एकूण 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर इतर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारात काही जुन्या मंत्र्यांना डच्चू दिला आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहेत. तर शिवसेनेत तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांना डच्चू दिला आहे.
भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु
दरम्यान, या आधी भुजबळांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तीच बाब लक्षात घेत पक्षाकडून भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. पक्षाकडून नाराजी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना भुजबळ प्रतिसाद देणार का? याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.



