पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी तातडीने भूसंपादन करण्यात येणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून करण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश दिले आहेत. विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट – डीपीआर) येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रस्तावित विमानतळाचे लवकरच ‘टेक ऑफ’ होईल, असा दावा केला जात आहे.
राज्यातील विमानतळ, विमानसेवा आणि विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्यामध्ये विमानतळाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरण, सैन्य दल, महाराष्ट्र विमानतळ महामंडळाचे आणि राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘विमान वाहतूक वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातील वाढ विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. विमानतळाचा डीपीआर सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच, मार्च २०२९ पर्यंत विमानतळ कार्यन्वित करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे,’ असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पुण्याचे सध्याचे विमानतळ सुसज्ज आणि अत्याधुनिक सोई सुविधायुक्त केले आहे. मात्र, शहर आणि परिसराच्या भवितव्याचा विचार करता पुरंदर विमानतळाचे काम वेगाने पूर्ण करावे लागेल. धावपट्टी वाढविण्यासाठी सहा महिन्यांत भूसंपादन करावे लागेल, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठीचा ओएलएस पूर्ण झाले असून, भूसंपादन येत्या सहा महिन्यांत करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढवण्यास मदत होऊन पुणेकरांना दिलासा मिळणार आहे, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोेळ यांनी केला.



