मुंबई: टाटा समूहातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरी गुरुवारी जाहीर केली. तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ११.९५ टक्क्यांनी वधारून १२,३८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नफ्याची कामगिरी बाजार विश्लेषकांच्या अपेक्षेनुरूप नसली तरी, कंपनीने भागधारकांना प्रति समभाग ७७ रुपयांच्या लाभांशाचा नजराणा मात्र घोषित केला आहे.
गेल्या वर्षी याच डिसेंबर तिमाहीत कंपनीने ११,०५८ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. तर याआधीच्या सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीने ११,९०९ कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला होता. टीसीएसचे एकूण उत्पन्न डिसेंबर तिमाहीत ६.१३ टक्क्यांनी वधारून ६५,२१६ रुपयांवर पोहोचले आहे. जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत ६१,४४५ कोटी रुपये होते आणि सप्टेंबर तिमाहीत ते ६४,९८८ कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले होते. कंपनीकडे सरलेल्या तिमाहीअखेर १,०२० कोटी डॉलरचे कार्यादेश आहेत. जे गेल्या वर्षी या कालावधीत ८६० कोटी डॉलरवर मर्यादित होते. तर कंपनीच्या खर्चातदेखील ६.३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीमधील ४५,६५८ कोटी रुपयांवरून, खर्च सरलेल्या तिमाहीत ४८,५५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारच्या सत्रात टीसीएसचा समभाग १.६९ टक्क्यांच्या घसरणीसह ४,०३८.८५ रुपयांवर स्थिरावला.
टीसीएसच्या संचालक मंडळाने भागधारकांना प्रति समभाग १० रुपये तिसरा अंतरिम लाभांश दिला आहे. तसेच मार्च २०२५ अखेर सरणाऱ्या आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ६६ रुपये प्रति समभाग विशेष लाभांश देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच एकूण ७७ रुपयांचा घसघशीत लाभांश भागधारकांना मिळणार आहे. या लाभांश प्राप्तीसाठी भागधारकांची पात्रता म्हणून १७ जानेवारी ही खातेनोंद अर्थात ‘रेकॉर्ड’ तारीख कंपनीने निश्चित केली आहे. येत्या ३ फेब्रुवारी रोजी भागधारकांना अंतरिम लाभांश आणि विशेष लाभांशाचे वाटप केले जाईल.
तिसऱ्या तिमाहीत कंपनीने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. कंपनीने अपस्किलिंग अर्थात कौशल्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी कृत्रिम प्रज्ञा (एआय) त्यातील नवीनीकरण आणि त्यासंबधित भागीदारीमध्ये गुंतवणूक वाढवत आहे.
– के. कृतिवासन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, टीसीएस



