पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, आज रविवारी सायंकाळी भोसरीतील सेक्टर १० येथील ऋषी पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सह तीन ते चार कंपन्यांमध्ये भीषण आग लागली. ज्या कंपनीत आग लागली त्या ठिकाणी रबर व प्लास्टिकचे साहित्य बनवत होते. ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली असून, परिसरात धुराचा लोट पसरला आहे.
आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाने तातडीने कारवाई करत भोसरी, मोशी, जाधववाडी आणि पिंपरी येथील अग्निशामक केंद्रांमधून १० गाड्या मागवून घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत.
आगीमुळे मोठ्या प्रमाणात संपत्तीचे नुकसान झाले आहे, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकले नाही, परंतु संबंधित कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.




