पुणे : पुणे मेट्रोची सेवा आता रात्री 11 वाजेपर्यंत उपलब्ध होईल, ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्यांना सोय होईल. वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट कॉरिडॉरवरील शेवटच्या गाड्या आता रात्री 10 वाजता सुटत आहेत.
आता एक तास वाढविल्याने दर 10 मिनिटांच्या अंतराने 6 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. हा वेळ एक तास वाढवण्यात आलेला आहे, ज्याचा उद्देश रेल्वे स्थानक, विमानतळ आणि इतर येणाऱ्या प्रवाशांसाठी रात्री उशिरापर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध करणे आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. दरम्यान हिच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शहरात मेट्रो देखील सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी यादरम्यान सध्या मेट्रो सुरू असून पुणे शहराला आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. मार्च 2025 अखेरपर्यंत शहरातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो सुरू होणार आहे.
पिंपरी चिंचवड आणि पुणेकरांचा प्रवास आणखी सुरक्षित आणि जलद होईल. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. हिंजवडी आयटी हब या ठिकाणी अनेक मोठमोठे आयटी कंपन्या अस्तित्वात असून शहरातील मध्यवर्ती भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी कामासाठी येतात. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग याच प्रवाशांसाठी विकसित केला जात आहे.




