
छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागाअंतर्गत संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून, बुधवारी त्याला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात आता आठ आरोपींवर मकोका गुन्हा दाखल आहे.
वाल्मीक कराड हा ३१ डिसेंबर रोजी दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील गुन्ह्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात शरण आला होता. तेव्हापासून त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत मंगळवारी संपुष्टात आल्यानंतर वाल्मीकला केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथे पुन्हा पोलीस कोठडीची विनंती करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ती मान्य न करता न्यायालयीन कोठडी सुनावली. या दरम्यानच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातही कराडवर संशय व्यक्त केला. त्या प्रकरणात यापूर्वी सात आरोपींवर मकोकाचा गुन्हा दाखल असून, वाल्मीक कराडवरही त्याचप्रमाणे मकोका गुन्हा दाखल करण्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या. त्यानुसार कराडवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा ताबा विशेष तपास पथकाने घेतला. संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडवरही मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. या मागणीसाठी स्थानिक राजकीय नेत्यांनीही जोर देत मागणी लावून धरली होती.
बीड जिल्ह्यात जमावबंदी
वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पडसाद परळीत उमटले. परळीतील बाजारपेठ ऐन संक्रांतीच्या दिवशी कडकडीत बंद करण्यात आली. कराड यांची आई पारूबाई कराड यांच्यासह कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी संबंधित दाखल गुन्हा खोटा असून तो रद्द करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. पांगरीजवळील गोपीनाथ गड परिसरात टायर जाळण्यात आले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात २८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश पारित करण्यात आले.



