आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत महायुतीचे आमदार आणि मंत्री यांच्याशी कामकाजासंदर्भात संवाद साधणार आहेत. मात्र मुंबईतील या कार्यक्रमापासून मंत्री धनंजय मुंडे यांना दुर ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
खासदार संजय राऊत म्हणाले की, “आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आले आहे की नाही माहीत नाही. पण उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री आहेत, ज्यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी मोठे आरोप केले आहेत. याशिवाय असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी आरोप केले होते. मग त्यांना पण मोदींच्या दौऱ्यापासून दूर ठेवणार का?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
आकाच्या आकावर कारवाई कधी होणार? :
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जात आहे. याप्रकरणी संजय राऊत म्हणाले की, मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत काहीही करून फायदा नाही. कारण ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून महायुतीच्या मंत्रिमंडळात आहेत, तसेच आकाच्या आकावर कारवाई कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.




