पुणे : शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर रात्री उशिरा, तसेच पहाटेच्या वेळी कचरा टाकला जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाने रात्रीदेखील स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कचरा गोळा करण्यासाठी ८१ नवीन वाहने विकत घेण्यात आली असून, ही वाहने रात्री ज्या रस्त्यांवर कचरा टाकला जातो, तेथे फिरणार आहेत. रात्री आणि पहाटे कचरा टाकताना आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
शहरातील चौकांमध्ये तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवर असलेल्या कचराकुंड्या महापालिकेने काढून टाकल्या आहेत. जागोजागी महापालिकेचा कचरा गोळा करणारी वाहने फिरत असतात. सकाळपासून महापालिकेच्या घनकचरा विभागाची वाहने सर्वत्र फिरून शहरातील कचरा गोळा करतात.
महापालिका रोजच्या रोज कचरा उचलत असतानाही काही नागरिक रात्री उशिरा तसेच पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडल्यानंतर रस्त्यांवर कचरा टाकत असल्याचे प्रकार समोर आले होते.
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून पथके देखील तयार केली आहेत. त्यांच्यामार्फत गस्त घातली जाते. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे महापालिकेच्या लक्षात आले.




