
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याच्यावर देखील आता मकोका लागला आहे. कराडवर मकोका लागताच त्याच्या संपत्तीबाबतही तपास केला जातोय. त्याची बाहेर ठिकाणी कुठे संपत्ती आहे का?, त्याचा शोध घेतला जातोय. यातच आता पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलंय.वाल्मिक बाबुराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत हा 4BHK फ्लॅट आहे.
या हायफाय फ्लॅटची किंमत तब्बल 3 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. कराडने मुंबई-पुणे यासारख्या मोठ्या शहरात मोठी गुंतवणूक केली असल्याची माहिती आहे. पिंपरी-चिंचवड पार्क स्ट्रीट सोसायटीत 601 नंबरचा फ्लॅट वाल्मिक कराडचा असल्याची माहिती आहे. या फ्लॅटवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कारवाई करत कर थकल्याने नोटीस लावली आहे.
वाल्मिक कराड याने पत्नीच्या नावे आणि ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती घेतल्याची माहिती आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत देखील वाल्मिक कराडने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याची माहिती आहे.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील मागे कराडच्या संपत्तीबाबत धक्कादायक दावा केला होता. सुरेश धस यांनी वाल्मिक कराडने तब्बल 1500 कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोप केला होता. बीडमध्ये वाल्मिक कराडने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली. तसेच त्याने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून प्रचंड पैसा गोळा केल्याचं देखील मागे समोर आलं होतं.




