
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या हत्याकांडात आरोपी असलेल्या सर्व जणांवर मकोका लावण्यात आला. मात्र, यात वाल्मिक कराडचा समावेशनव्हता. कराडवर आवादा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप असून त्याच्यावर मकोका लावण्यात आला नव्हता. कराडवर मकोका लावण्यासाठी बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर काल कराडवर देखील मकोका लावण्यात आला.
सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी (14 जानेवारी) मोठा धक्का बसला. सरपंच हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका ठेवत कराडवर मकोका ( MACOCA ) लावण्यात आला. यानंतर परळीत मोठा राडा पाहायला मिळाला. जाळपोळ, ठिय्या आंदोलने तसेच कराड समर्थकांकडून आत्मदहनचा प्रयत्न करण्यात आला. आजही परळीत तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे. अशात बीडमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे.
कराडवर मकोका लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अॅक्शन मोडवर आले आहेत. कराड हा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात होती. त्यातच अजित पवारांनी आता एक मोठा निर्णय घेतलाय. हा धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त आली आहे. अजितदादांनी (Ajit Pawar) संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं.अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे.



