
मुंबई : नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा प्रेक्षागृहात येत्या शनिवार आणि रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘कोल्ड प्ले’ कार्यक्रमाच्यनिमित्ताने या संपूर्ण पट्ट्यात दहा ते पंधरा हजार वाहने येण्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी वर्तवली आहे. वाहनांच्या गर्दीमुळे शहरात वाहतूक कोंडी होणार असून त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमानिमित्त खासगी लोकल सेवा चालविण्यात येणार असून रेल्वे प्रवाशांनाही त्यांचा फटका बसणार आहे.
नवी मुंबईत १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी कोल्ड प्ले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाचा एक भाग म्हणून आयोजकांनी सिटी फ्लो तसेच इतर वाहतूक सेवासंबंधित कंपन्यांशी करार केल्याचे समजते. या खासगी बस कार्यक्रम स्थळापर्यंत येण्यासाठी उपलब्ध असतील, अशी माहिती वाहतूक पोलीस सूत्रांनी दिली. कार्यक्रमास्थळापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला खारघर मैदान, नेरूळ मैदान, तसेच या भागातील विस्तीर्ण अशा मैदानाची वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक रसिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करूनच कार्यक्रम स्थळी यावे, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या अधिक बसगाड्या वाहतुकीसाठी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता ठाणे आणि नवी मुंबईत मोठे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. या दोन्ही शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली. या ठिकाणी दहा ते पंधरा हजार वाहने येऊ शकतात, याचा विचार करून वाहनतळांचे नियोजन केले जात आहे. वाहनतळासाठी नवी मुंबई विमानतळाकरिता आरक्षित असलेली जागा खुली करून देण्याचा विचार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मात्र या विषयाच्या अंतिम निर्णय शुक्रवारीच घेतला जाईल, अशी माहिती नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
दरम्यान, लहान मुलांना संगीत कार्यक्रमातील आवाजामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून लहान मुलांना घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वाहनतळ कुठे?
नवी मुंबईतील तुलसी मैदान येथे १०० वाहने उभी करण्याची व्यवस्था असणार आहे.
भीमाशंकर सोसायटी येथील सिडको पार्किंग पाँईंटजवळ ७०० वाहने, सेकटर १५ सीबीडी येथे ५०० वाहने अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
नेरूळ आणि जुईनगर रेल्वे स्थानकातून नवी मुंबई परिवहन सेवेच्या दहा गाड्या प्रवाशांसाठी देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रम आयोजकांच्या वतीने पंचशील मैदानात दोन हजार वाहने उभी करण्याची व्यवस्था आहे.
खारघर येथेही वाहनतळाची व्यवस्था असणार आहे.
रेल्वे प्रवाशांना त्रास
मुंबई : कोल्डप्ले कार्यक्रमासाठी खासगी लोकल सेवा चालवण्यासाठी ‘बुकमाय शो लाईव्ह’ने भारतीय रेल्वेशी भागीदारी केली आहे. ही विशेष लोकल सेवा १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी चालविली जाणार असून कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांचा प्रवास त्यामुळे आरामदायी होईल, मात्र यावेळी सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. तीन दिवस गोरेगाव ते नेरुळदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्याचे नियोजन करण्यात आले असून ही लोकल अंधेरी, वांद्रे, चेंबूर आणि जुईनगर मार्गावरून धावेल. कोल्ड प्ले कार्यक्रमाचे चाहते त्यांची तिकिटे बुक माय शोवर पाचशे रुपयांत आरक्षित करू शकतात. या तीन दिवशी गोरेगाव ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे.
रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था
बुक माय शोकडून लोकल आरक्षित केल्या आहेत. या लोकलमध्ये कोणाला प्रवास करून घ्यायचा ही जबाबदारी त्यांची असेल. मात्र रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, म्हणून सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
खासगी लोकलचे नियोजन
१८, १९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता गोरेगाववरून लोकल सुटेल. ही लोकल अंधेरी-वांद्रे-चेंबूर-जुईनगर मार्गावरून नेरुळपर्यंत धावेल.
रात्री ११ वाजता नेरुळवरून जुईनगर-चेंबूर-वांद्रे-अंधेरी या मार्गाने गोरेगावला जाईल.
२१ जानेवारी रोजी चार लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. दुपारी २ आणि दुपारी ३ वाजता गोरेगाव-नेरुळ लोकल धावेल. तर, रात्री १०.४५ आणि रात्री ११ वाजता नेरुळ-गोरेगाव लोकल धावेल.



