अंधेरी : १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईच्या वांद्रे परिसरात काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि या घटनेतील वेगवेगळे पदर उघड होऊ लागले. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून त्यात बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव समोर आलं आहे. बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणारा प्रमुख हल्लेखोर शिवकुमार गौतम याच्या कबुलीजबाबात दाऊदचं नाव आलं आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई यानंच बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी दिली होती, असं शिवकुमारनं सांगितल्याचं या वृ्त्तात नमूद केलं आहे. बाबा सिद्दिकींचा दाऊद इब्राहिमशी आणि १९९३ च्या बॉम्ब ब्लास्ट घटनेशी संबंध असल्याचं या हल्लेखोरांना सांगण्यात आलं होतं. आपला थेट अनमोल बिष्णोईशी संवाद झाला होता, त्यानं बाबा सिद्दिकी किंवा झिशान सिद्दिकी यांपैकी एकाची हत्या करण्यास सांगितलं होतं आणि त्याबदल्यात १० ते १५ लाख रुपयेही देण्याचं कबूल केलं होतं, असं शिवकुमार गौतमनं जबाबात सांगितलं आहे.
हल्लेखोर, नियोजन आणि हत्या!
शिवकुमार गौतमला नोव्हेंबर महिन्यात नेपाळला पळून जाताना अटक करण्यात आली. त्यानं दिलेल्या कबुलीजबाबानुसार, स्नॅपचॅटद्वारे संवाद साधून हत्येचा कट रचण्यात आला. शुभम लोणकरनं आपण बिष्णोई गँगसाठी काम करत असल्याचं गौतमला सांगितलं. जून महिन्यात शुभमनं गौतम आणि धर्मराज कश्यप (दुसरा हल्लेखोर) यांना हत्येच्या बदल्यात १० ते १५ लाख रुपये मिळू शकतात, असं सांगितलं. तेव्हा त्यानं फक्त बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी ही दोन नावं हल्लेखोरांना सांगितली.
अनमोल बिष्णोई म्हणाला, “डर लग रहा है क्या?”
हल्लेखोरांशी बोलल्यानंतर शुभमनं स्नॅपचॅटच्या मदतीने थेट अनमोल बिष्णोईशी व्हिडीओ कॉलवर संपर्क साधला. अनमोल बिष्णोई कॉल हल्लेखोरांना म्हणाला, “डर लग रहा है क्या?” असं गौतमच्या कबुली जबाबातून समोर आलं आहे. तसेच, जेवढे पैसे लागतील, तेवढे शुभम लोणकरकडे मागण्यासही अनमोल बिष्णोईनं हल्लेखोरांना सांगितलं.
यानंतर काही दिवसांनी शुभम लोणकर आणि धर्मराज कश्यपनं गौतमला सांगितलं की मुंबईत राहणाऱ्या बब्बू सिंह नामक व्यक्तीकडून हत्येसाठी लागणारी शस्त्रं पुरवली जातील. हत्येनंतर शुभम लोणकर, अनमोल बिष्णोई किंवा त्यांच्या गँगमधील इतर कुणीतरी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी स्वीकारेल असंही ठरलं.
अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दिली पिस्तुलं!
४ सप्टेंबर रोजी बिष्णोईनं गौतमला स्नॅपचॅटवर फोन करून अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ सबंधित व्यक्ती शस्त्र घेऊन येईल, असं सांगितलं. तिथे मास्क आणि टोपी घातलेल्या एका व्यक्तीनं आपल्याला दोन पिस्तुलं आणि काही काडतुसं असणारं एक लाल रंगाचं पार्सल सोपवलं असं गौतमनं कबुलीजबाबात सांगितलं आहे. तसेच सिद्दिकींच्या घर, कार्यालयाची रेकी करण्यासाठी एक काळ्या रंगाची बाईकही आपल्याला देण्यात आली होती, असं त्यानं नमूद केलं आहे.



