
सोमवारी दुपारी छमछम पार्टीतील संशयित आरोपींची मेढा पोलीस स्टेशनला हजेरी होती. हजेरी झाल्यानंतर ते सातारकडे परत येताना यामधील काही युवकांचा दुचाकी व कारमधून आलेल्या एका टोळीने पाठलाग सुरु केला. कोंडवे येथील रस्त्यावर दुपारी 4 वाजता या टोळीने दुचाकीवरुन जाणार्या दोघांना ओव्हरटेक केले. त्यावेळी दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोन्ही युवकांच्या गुडघ्याला व कमरेला गोळी चाटून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. भरदिवसा गोळीबार झाल्याने परिसरात भितीमुळे तारांबळ उडाली. गोळीबाराची घटना सातारा तालुका पोलिसांना समजल्यानंतर पोनि निलेश तांबे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमी युवकांना उपचारासाठी सिव्हीलमध्ये नेल्याचे समजल्यानंतर पोलिसांचे एक पथक तिकडे गेले. तेथे जखमींकडून प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी संशयितांची शोधासाठी पथके रवाना केली. गोळीबारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांचा तपासाचा मार्ग आणखी सुकर झाला. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेवून तपासाच्या सूचना केल्या. दरम्यान, युवकांवर गोळीबार झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांना व मित्रांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
एकाला ताब्यात घेतले
सोमवारी दुपारी गोळीबाराची घटना घडल्यानंतर सातारा पोलिस अलर्ट मोडवर गेले. आठवड्याभरात भरदिवसा दुसरी गोळीबारीची घटना घडल्याने पोलिसांना दुपारचा घाम फुटला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. एका हल्लेखोराची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. संशयिताच्या सहभागाबाबत पोलिस खात्री करत होते.



