बीड : पालकत्व स्विकारल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आहेत. बीड दौऱ्याला सुरुवात होताच पवारांनी जिल्ह्यातील राजकीय नियोजनाला सुरुवात केली आहे. मोठा निर्णय घेत अजित पवार यांनी भाजप नेते सुरेश धस यांना मोठा धक्का दिला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांची हकलपट्टी करण्यात आली आहे. अजित पवारांच्या या भूमिकेनंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
पुणे आणि बीड जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील निर्णय हा भाजप आणि राष्ट्रवादीच्या जुन्या विधानमंडळ सदस्यांना हा धक्का मानला जात आहे. या निर्णयाचे महायुतीत काही पडसाद उमटणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
तसेच, गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी केली आहे. मुंडेंबाबत रोज नवं नवे खुलासे धस करताना दिसत आहेत. अशातच आज पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळं राजकीय गोटात अजितदादांनी सुरेश धसांचा करेक्ट कार्यक्रम केला अशी चर्चा रंगली आहे.
अजित पवार हे गुरुवारी सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झाले. यावेळी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. बैठकीपूर्वी अजितदादांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांवर टोलेबाजी करत रोखठोक इशारा दिला. बीड दौऱ्यानंतर अजित पवार आजच पुण्यात येणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी चार वाजता होणार बैठक होणार आहे.



