गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदेंनी दांडी मारली. तसेच, गेल्यावेळी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीलाही शिंदेंना अनुपस्थिती दर्शवली होती. त्यामुळं नारजीच्या चर्चेवर राजकीय वर्तुळात शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ठाकरेंच्या खासदाराने शिंदेंबाबात केलेली वाणी खरी ठरल्याची चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सोशल वॉर रूमची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मात्र, एकनाथ शिंदे हजर नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीचा कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, शिंदे यांनी विभागांची आढावा बैठक बोलावली होती. ती बैठक देखील रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये नगर विकास विभागाचे आणि पाणीपुरवठा विभागाची बैठक त्यांनी रद्द केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
गेल्या वेळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीलाही एकनाथ शिंदे प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक किंवा आत्ताच्या झालेल्या या बैठका यांना त्यांची अनुपस्थिती असणं चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळं राज्यात नाराजीच्या चर्चेनं जोर धरला आहे. पालकमंत्री पदासाठी असलेला दावा किंवा खातेवाटपाचा प्रश्न किंवा इतर अधिकार या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, काल ठाकरेंच्या खासदाराने सामना मुखपत्रातून रोखठोक भूमिका मांडत ‘अमित शाहंनी दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळं शिंदेंच्या मनात फसवणुक झाल्याची भावना आहे. ‘ असा दावा केला होता.



