वाकड (पुणे) – वाकड येथील सयाजी हॉटेलच्या जवळ असलेल्या बालवडकर पेट्रोल पंपावर आज सायंकाळी एक अपघाती घटना घडली. बीएमडब्ल्यू गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे ती संपूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला सूचित केले, परंतु गाडीचा मोठा भाग जळाल्यानंतरच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.

हॉटेल व पेट्रोल पंपाच्या नजीक असलेल्या कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गालगत सर्विस रस्त्यावर ट्रॅफिकची मोठी गर्दी होती. गाडीच्या अचानक पेट घेतल्यामुळे काही काळ रोडवर वाहतूक कोंडी झाली. गाडीच्या ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर पडण्यात यश आलं आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली असून, गाडीच्या आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे आणि आग लागण्याच्या कारणांची शहानिशा केली जात आहे.
स्थानीकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाजवळ असलेल्या या वर्दळीच्या भागात दुर्घटना घडल्यामुळे अनेक जण दहशतीत आले होते.अधिक तपासासाठी पोलिस आणि अग्निशमन विभाग कार्यरत आहेत.




