
नाशिक : सध्या मालेगावसह राज्यभरात बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गाजत आहे. अलीकडेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यातच आता नाशिक पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या नाशिकमध्ये राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांगलादेशी नागरिकांविरोधात राज्यात सर्वत्र कारवाई सुरू असताना नाशिक पोलिसांनी बांधकाम साईटवरून 8 बागलदेशी नागरिकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे नाशिक पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर मजूर सुपरवायझरचे काम करत होते. चार-पाच दिवस पोलिसांनी बांधकाम साईटवर मजुरी करतानाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
पश्चिम बंगालमधील एजंटच्या माध्यमातून भारतात प्रवेश?
त्यातील 3 जणांकडे आधारकार्ड पॅनकार्ड आढळून आले आहेत. नाशिक व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून त्यांनी आधारकार्ड मिळवले आहेत. 8 पैकी 1 जण मागील 12 वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास आहे. तर इतर जण काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये आले आहेत. या बांगलादेशी नागरिकांना भारतात पाठविणारे रॅकेट असून पश्चिम बंगालमधील एजंटच्या माध्यमातून भारतात प्रवेश करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या नागरिकांना आश्रय देणारे, बनावट कागदपत्रे देणारे आणि नोकरी देणाऱ्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे.
‘हे’ आठ बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात
- सुमन कालाम गाझी (27)
- अब्दुला अलीम मंडल (30)
- शाहीन मफिजुल मंडल (23)
- लासेल नुरअली शंतर (23)
- आसाद अर्शदअली मुल्ला (30)
- आलीम सुआनखान मंडल (32)
- अलअमीन आमीनुर शेख (22)
- मोसीन मौफीजुल मुल्ला (22)
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रविण माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण, किशोर देसले, बाळु बागुल, नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार गणेश वाघ, समिर चंद्रमोरे, मनिषा जाधव, वैशाली घरटे, अतुल पाटील, गौरख खांडरे, युवराज कानमहाले यांच्या पथकांनी केली.



